राष्ट्रीय पोषण अभियान व वृक्ष लागवड कार्यक्रम संपन्न
नागपूर :- महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, दुधबर्डी तर्फे राष्ट्रीय पोषण अभियान व वृक्ष लागवड कार्यक्रमाचे आयोजन सावनेर तालुक्यातील बोरुजवाडा येथे करण्यात आले होते.
केंद्रीय कृषि व शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी ऑनलाईन माध्यमातून शेतकरी व महिलांना मार्गदर्शन केले. मानवी आरोग्यासाठी सुपोषणाचे महत्व सांगताना परसबाग लागवड करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले आणि नॅनो युरियाचे मृदा संरक्षण व उत्पादकता वाढीतील योगदान या विषयांवर मार्गदर्शन केले.
राष्ट्रीय पोषण अभियान व वृक्ष लागवड कार्यक्रमास कृषी विज्ञान केंद्र दुधबर्डी येथील वरिष्ठ वैज्ञानिक तथा प्रमुख डॉ. सारिपुत लांडगे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. बोरुजवाड्याच्या सरपंच चंदा निंबाळकर, या विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या तर इंडियन फार्मर्स फर्टीलायझर कोऑपरेटीव्ह लिमिटेडचे शुभम मोहकरे, मार्केटिंग असिस्टंट संदीप तुमराम, प्रबंधक महेश सोलासे पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमामध्ये सावनेर तालुक्यातील अंगणवाडी सेविका आणि शेतकरी विशेष उपस्थित होते.
कार्यक्रमामध्ये ईफकोद्वारा निर्मित भाजीपाला बियाण्यांचे किट वाटप कृषी विज्ञान केंद्र मार्फत करण्यात आले आणि बोरूजवाडा ग्राम पंचायतीच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले.
डॉ. सारिपुत लांडगे, वरिष्ठ वैज्ञानिक तथा प्रमुख यांनी अध्यक्षीय भाषणात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सुदृढ आरोग्यासाठी भाजीपाल्याचे आहारातील महत्व समजावून सांगितले. अंगणवाडी सेविकांनी या किटचा वापर परसबाग लावून भाजीपाल्याचा वापर अंगणवाडीतील पोषण आहारात करावा, असा सल्ला दिला. वाटप केलेल्या भाजीपाला बियाणांच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना आवाहन केले. सोबतच प्राण्यांना होणाऱ्या लंपी रोगाबद्दल समज आणि गैरसमज याबद्दल माहिती पशुपालकांना समजावून सांगितली.
मयुरी ठोंबरे विषय विशेषज्ञ (गृहविज्ञान) यांनी बालके, महिला व किशोरवयीन मुलींमधील कुपोषणाचे प्रमाण घटवण्या करिता भाजिपाल्याचे आहारातील महत्व कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना समजावून सांगितले.
शुभम मोहकरे, ईफको यांनी उपस्थित शेतकऱ्यांना ईफको बद्दल माहिती सांगितली व पिकांमध्ये नॅनो युरियाचा वापर कसा करावा, हे समजून सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन विषय विशेषज्ञ (गृहविज्ञान) मयुरी ठोंबरे यांनी केले. भूषण भक्ते, पवन ततोडे, राकेश खोब्रागडे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाला एकूण 60 शेतकरी व महिला उपस्थित होते.