जागतिक अन्न सुरक्षा दिनानिमित्त 5व्या राज्य अन्न सुरक्षा निर्देशांकाचे डॉ.मनसुख मांडविया यांच्या हस्ते अनावरण

अन्न सुरक्षा आणि नवोन्मेषासाठी भारताची वचनबद्धता प्रदर्शित करण्यासाठी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाकडून जागतिक अन्न सुरक्षा दिन साजरा

नवी दिल्ली :- जागतिक अन्न सुरक्षा दिनानिमित्त नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे 7 जून 2023 (बुधवार) रोजी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय ) एक संवादात्मक सत्र आयोजित करून अन्न सुरक्षा आणि नवोन्मेषासाठी आपल्या समर्पित कार्याची वचनबद्धता दर्शवली.

या कार्यक्रमाला केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ मनसुख मांडविया यांच्यासह आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रा.एस.पी.सिंह बघेल हे देखील उपस्थित होते.

या कार्यक्रमात , अन्न सुरक्षेच्या सहा वेगवेगळ्या पैलूंमध्ये राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या कामगिरीचे मूल्यांकन करणाऱ्या 5 व्या राज्य अन्न सुरक्षा निर्देशांकाचे (एसएफएसआय ) अनावरण डॉ. मनसुख मांडविया यांनी केले. निकोप स्पर्धा वाढवणे आणि संपूर्ण देशभरातील अन्न सुरक्षा व्यवस्थेमध्ये सकारात्मक बदल घडवून आणणे, शेवटी सर्वांना सुरक्षित आणि पौष्टिक अन्नाची तरतूद सुनिश्चित करणे हे 2018-19 मध्ये सुरु केलेल्या राज्य अन्न सुरक्षा निर्देशांकाचे (एसएफएसआय ) उद्दिष्ट आहे.

विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या कामगिरीची दखल घेत डॉ. मनसुख मांडविया यांनी 2022-23 या वर्षातील त्यांच्या क्रमवारीच्या आधारे विजेत्यांना सन्मानित केले.मोठ्या राज्यांमध्ये, केरळने अव्वल क्रमांक मिळवला त्यापाठोपाठ पंजाब आणि तामिळनाडूचा क्रमांक लागतो. लहान राज्यांमध्ये गोवा अव्वल आहे त्यानंतर मणिपूर आणि सिक्कीमचा क्रमांक लागतो. याव्यतिरिक्त, केंद्रशासित प्रदेशांमध्ये जम्मू आणि काश्मीर, दिल्ली आणि चंदीगढ यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवला. ज्या राज्यांनी त्यांच्या राज्य अन्न सुरक्षा निर्देशांकात लक्षणीय सुधारणा दर्शविली आहे त्या राज्यांची डॉ. मनसुख मांडविया यांनी प्रशंसा केली.

याशिवाय, केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी जिल्ह्यांसाठीच्या इट राइट चॅलेंज – टप्पा II च्या विजेत्यांना सन्मानित केले.या जिल्ह्यांनी पोषक अन्न आणि अन्न सुरक्षेबद्दल जागरुकता निर्माण करण्याच्या अनुषंगाने योजना राबविण्यासाठी उत्कृष्ट प्रयत्नांचे दर्शन घडवले. उल्लेखनीय म्हणजे, अपवादात्मक निकाल असलेले बहुतांश जिल्हे तामिळनाडू, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात आहेत.260 सहभागी जिल्ह्यांपैकी 31 जिल्ह्यांनी 75% किंवा त्याहून अधिक गुण मिळवले आहेत.

देशभरात अन्न गुणवत्ता मानकांची पूर्तता सुनिश्चित करण्यासाठी,अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाकडून पुढील 3 वर्षात 25 लाख अन्नपदार्थ व्यवसाय परिचालकांना प्रशिक्षित केले जाईल, अशी घोषणा डॉ.मनसुख मांडविया यांनी केली. अन्न सुरक्षा, स्वच्छता आणि पोषणाच्या गुणवत्तापूर्ण मापदंडांची पूर्तता करणाऱ्या 100 खाऊगल्ल्या देशभरात उभारण्याची घोषणा त्यांनी केली आहे. “अन्नाचा दर्जा हा निरामयतेचा भाग आहे”, असे डॉ मांडविया यांनी नमूद केले.

अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाकडून सुरु करण्यात आलेल्या रॅपिड फूड टेस्टिंग किट (आरएएफटी ) पोर्टलसह अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमांचे अनावरण डॉ. मांडविया यांनी केले.पारदर्शकता आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करून आरएएफटी योजनेचे कामकाज सुव्यवस्थित करणे हे या पोर्टलचे उद्दिष्ट आहे. या पोर्टलच्या माध्यमातून अर्जदार आता ऑनलाइन मंजुरीसाठी सोयीने अर्ज करू शकतात आणि अर्ज प्रक्रियेपासून प्रमाणपत्र जारी करणे तसेच नूतनीकरणापर्यंतचे सर्व टप्पे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पार पाडले जाऊ शकतात.

कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी देशभरात अन्न सुरक्षेची अंमलबजावणी वाढवण्यासाठी तयार केलेल्या तीन नियमावलीचे प्रकाशन केले.या नियमावलीमध्ये खाद्यपदार्थ – मासे आणि मत्स्य उत्पादनांच्या विश्लेषणाच्या पद्धतींची नियमपुस्तिका, खाद्यपदार्थ – तृणधान्ये आणि अन्नधान्य उत्पादने – दुसरी आवृत्ती विश्लेषणाच्या पद्धतींची नियमपुस्तिका आणि खाद्यपदार्थ – पेये: चहा, कॉफी आणि चिकोरी यांच्या विश्लेषणाच्या पद्धतींची नियमपुस्तिका समाविष्ट आहेत.

NewsToday24x7

Next Post

तिसऱ्या जी 20 आंतरराष्ट्रीय आर्थिक स्थापत्य कार्यगटाच्या बैठकीचा समारोप

Thu Jun 8 , 2023
पणजी :-भारताच्या अध्यक्षतेखालील तिसऱ्या जी 20 आंतरराष्ट्रीय आर्थिक स्थापत्य कार्यगटाच्या बैठकीचा (आयएफए डब्ल्यूजी ) 7 जून 2023 रोजी गोव्यात समारोप झाला. दोन दिवस चाललेल्या या बैठकीत जी 20 सदस्य देश, निमंत्रित देश आणि बहुस्तरीय विकास बँकांसह (एमडीबी ) ,विविध आंतरराष्ट्रीय संस्थांमधील सुमारे 100 प्रतिनिधींचा सहभाग होता.आंतरराष्ट्रीय आर्थिक स्थापत्य कार्यगटाचे सह-अध्यक्षपद भूषवणाऱ्या फ्रान्स आणि कोरिया प्रजासत्ताक या देशांसह वित्त मंत्रालय आणि […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com