विरंगुळा केंद्राच्या विकासासाठी खासदार निधीतून ५० लाख देणार – लोकार्पण प्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा

नागपूर :- ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात आनंद बहरून यावा, त्यांना पुढील आयुष्य आनंदात जगता यावे, याकरीता पूर्व नागपुरात उभारण्यात आलेल्या विरंगुळा केंद्राच्या विकासासाठी खासदार निधीतून ५० लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नागपूर महानगरपालिकेच्या वतीने आमदार कृष्णा खोपडे यांच्या आमदार निधीतून प्रभाग क्र. २६ अंतर्गत येणाऱ्या दर्शन कॉलनी येथे विरंगुळा केंद्र उभारण्यात आले. ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त या केंद्राचे लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थिताना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.याप्रसंगी आमदार प्रवीण दटके, आमदार टेकचंद सावरकर, आमदार विकास कुंभारे यांच्यासह माजी मंत्री व ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष दत्ता मेघे, मनपाच्या मुख्य अभियंता लीना उपाध्ये, कार्यकारी अभियंता कमलेश चौहान, फेस्कॉनचे अध्यक्ष वसंतराव कळंबे, माजी नगरसेवक नरेंद्र (बाल्या) बोरकर, समिता चकोले, जितेंद्र (बंटी) कुकडे, ऍड. धर्मपाल मेश्राम, मनीषा कोठे, जे.पी. शर्मा यांच्यासह पूर्व नागपूरातील माजी नगरसेवक नगसेविका यांच्यासह राम आंबुलकर, प्रमोद पेंडके, राजू गोतमारे उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पुढे म्हणाले की, ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळ्याचे साधन उपलब्ध व्हावे तसेच या केंद्रात आल्यावर त्यांना संपूर्ण सोयी सुविधा मिळाव्यात याकरिता माझ्या खासदार निधीतून ५० लाख रुपये देण्यात येईल. या निधीचा वापर विरंगुळा केंद्रावर सोलर पॅनल बसविण्यासाठी व संपूर्ण केंद्र वातानुकूलित करण्यासाठी करण्यात येईल. यासोबतच योग प्रशिक्षण तसेच कीर्तन नाटक सिनेमा आधी मनोरंजनाची साधने देखील विरंगुळा केंद्रात उपलब्ध करण्यात येईल. ज्येष्ठ नागरिकांच्या आयुष्यात आनंद आणि समाधान असणे हीच आमची शक्ती आहे. कष्ट आणि मेहनत करून जीवन जगणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनचे पुढील आयुष्य आनंदात जावे हाच प्रयत्न या माध्यमातून केल्या जात आहे. पुढील काळात खासदार महोत्सव अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष ज्येष्ठ नागरिक खासदार महोत्सवाचे आयोजन केल्या जाणार असल्याची घोषणही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली. ज्येष्ठ नागरिक खासदार महोत्सव अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष कविता संमेलन, नानाविध स्पर्धा आयोजित केल्या जातील. याशिवाय त्यांच्यासाठी विशेष बस सेवा आरोग्य तपासणी शिबिर आदी सेवा उपलब्ध करून देण्यात येईल. असे सांगत ज्येष्ठ नागरिकांनी स्वतःच्या शरीर सुदृढ ठेवण्यावर भर द्यावा. नियमित योगासन प्राणायाम करावे असे आवाहन ही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक वसंतराव कळंबे यांनी केले. कार्यक्रमादरम्यान विविध ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा सत्कार करण्यात आला. तर विरंगुळा केंद्रासाठी सहकार्य केलेल्या मनपाच्या अधिकारी, कर्मचारी यांचा सत्कार नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार कृष्णा खोपडे म्हणाले की, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनाला आनंद मिळण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून हे केंद्र उभारण्यात आले असल्याचे सांगत ज्येष्ठ नागरिकांचे मार्गदर्शन नेहमी मिळत असल्याची भावना व्यक्त केल्या.

विरंगुळा केंद्राची सुसज्ज इमारत 

नागपूर महानगरपालिकेच्या वतीने २०२२-२३ या कालावधीत विरंगुळा केंद्राचे बांधकाम झालं आहे. विरंगुळा केंद्रासाठी १.४ कोटी रुपये खर्च झाले असून, विरंगुळा केंद्रात ज्येष्ठ नागरिकांना लागणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी दोन चेंगिंग रूम, भव्य हॉल, सोलर पॅनल, उत्तम फर्निचर, मनोरंजनाचे साधन, ज्येष्ठांना सोईस्कर होईल असे शौचालय या इमारतीत तयार करण्यात आले असल्याची माहिती मुख्य अभियंता लीना उपाध्ये यांनी दिली.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com