संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा ३८ वा दीक्षांत समारोह संपन्न

आपण समाजाला काय देऊ शकतो याचा विचार स्नातकांनी करावा  : राज्यपाल
 
युवकांनी ठरविल्यास ते समाज परिवर्तन घडवू शकतात
अमरावती – समाजाने आपल्याला काय दिले याचा विचार न करता आपण समाजाला काय देऊ शकतो याचा विचार स्नातकांनी करावा. स्नातकांनी सर्वप्रथम जीवनातील आपले ध्येय सुनिश्चित करावे व आई वडील व राष्ट्रसेवेचा संकल्प करावा. युवकांनी ठरविल्यास ते समाजात परिवर्तन देखील घडवू शकतात असे प्रतिपादन राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

राज्यपाल कोश्यारी यांच्या दूरस्थ उपस्थितीत बुधवारी (दि. २५) संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा अडतिसवा दीक्षांत समारंभ संपन्न झाला, त्यावेळी राजभवन मुंबई येथून सहभागी होताना राज्यपाल बोलत होते.

आज जग संशोधन, नवसंशोधन, इन्क्युबेशनच्या युगात प्रवेश करीत आहे. हे संशोधन विज्ञान किंवा कृषी विज्ञान या क्षेत्रातच करता येते असे नाही तर ते इतिहास, मानव्यशास्त्र यांसह सर्व शाखेत करता येते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे आंतर शाखीय अध्ययन तसेच विज्ञानासोबत संगीत शिकण्याची देखील संधी उपलब्ध आहे. अश्यावेळी विद्यार्थ्यांनी स्टार्ट अप, स्वयंरोजगार या माध्यमातून नवउद्यमी झाले पाहिजे.  केवळ नोकरी शोधणे हे लक्ष्य ठेवल्यास आत्मनिर्भरतेचे ध्येय गाठता येणार नाही असे राज्यपालांनी सांगितले. 

हरियाणा येथील एका गावात अमेरिकेतून उच्च शिक्षण घेऊन आलेली तरुणी सरपंच म्हणून कार्य करीत आहे असे सांगून स्नातकांनी पदवीनंतर देखील आपले शिक्षण सुरु ठेवावे तसेच गावाच्या, राज्याच्या व देशाच्या विकासात योगदान द्यावे असे राज्यपालांनी सांगितले.
 
स्नातकांनी महापुरुषांचे आदर्श समोर ठेवावे : उदय सामंत 
पदवी प्राप्त केल्याबद्दल स्नातकांचे अभिनंदन करताना युवकांनी छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक यांचे जीवनचरित्र अभ्यासावे तसेच संत गाडगेबाबा यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.  विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांची, विद्यापीठाची तसेच राज्याची नेहमी आठवण ठेवली पाहिजे असेही त्यांनी सांगितले. 
संत गाडगेबाबा विद्यापीठाने या वर्षीपासून पदवी व पदव्युत्तर स्तरावरील अभ्यासक्रमांना पसंतीवर आधारित श्रेयांक पद्धत (चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम ) लागू करण्याचा निर्णय घेतला असल्याचे कुलगुरु डॉ दिलीप मालखेडे यांनी आपल्या अहवालात सांगितले.

नव्या अभ्यासक्रमामध्ये अनिवार्य प्रकल्प, कौशल्याधारित शिक्षण, इंटर्नशिप, सेमिनार, फिल्डवर्क, इत्यादींचा समावेश केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यपालांच्या हस्ते ५५०१९ स्नातकांना पदव्या व १२५ पदवीका प्रदान करण्यात आल्या. दीक्षांत समारंभात २१० संशोधकांना आचार्य पदवी तसेच १३६ गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्ण व रौप्य पदके तसेच रोख पारितोषिके प्रदान करण्यात आले. 
यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, संख्या व परीक्षा मूल्यमापन मंडळ डॉ. हेमंत देशमुख, विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता तसेच स्नातक उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

Governor Koshyari presides over 38th Convocation of Sant Gadge Baba Amravati University

Thu May 26 , 2022
Amravati –  University, Amravati through online mode on Wed (25 May). Governor of Maharashtra and Chancellor of University Bhagat Singh Koshyari presided over the 38th Annual Convocation of the Sant Gadge Baba Amravati University, Amravati through online mode on Wed (25 May). Speaking on the occasion, the Governor called upon graduating students to set higher goals in life and strive to […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com