२८८ जागा भाजप चिन्हावरच लढवल्या जातील आणि त्यानंतर शिंदे गटाचे नामोनिशाणही राहणार नाही – जयंत पाटील

मुंबई  :- भाजप शिंदे गटाला ४८ जागा सोडायला तयार दिसतेय परंतु अजून एक वर्ष निवडणुकीला असून २८८ जागा भाजप चिन्हावरच लढवल्या जातील आणि त्यानंतर शिंदे गटाचे नामोनिशाणही राहणार नाही अशी खात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

आज राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात जयंत पाटील आले असता माध्यमांनी त्यांच्याशी संवाद साधला.

एकदा भाजप महाराष्ट्रात निवडणूका लढवेल आणि महाविकास आघाडीच्या समोर फक्त एकटा भाजप असेल शिंदे गट तोपर्यंत टिकेल असे मला वाटत नाही अशी शक्यताही जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

भाजपला स्थानिक पक्ष, राज्यस्तरावरील पक्ष, त्यांचे अस्तित्व त्यांना मान्य नाही. भाजपला असं वाटतंय की आपली मते हे पक्ष खाणार आहेत त्यामुळे स्थानिक पक्षांना संपवण्याचे काम अव्याहतपणे प्रत्येक राज्यात भाजपने केले आहे. त्यांचा मित्र असो या शत्रू असो त्यांना फोडणे त्यांच्यावर वेगवेगळ्या कारवाया करणे आणि त्यांना नामोहरम करुन त्यांच्या मागे जाणारी मतं आपल्या मागे वळवणे हा त्यांचा एककलमी कार्यक्रम असतो असेही जयंत पाटील म्हणाले.

शिंदे गट राहणार की नाही हा प्रश्न लोकांच्या मनात आहेच आणि यदाकदाचित राहिला तर भाजप सर्वे करेल आणि जाहीर केलेल्या ४८ जागांपैकी एकनाथ शिंदे यांना सांगतील तुमच्या ५-६ जागा निवडून येणार आहे. त्यामुळे उरलेल्या ठिकाणी आम्ही वेगळा पर्याय देतो. अशी परिस्थिती शेवटच्या क्षणी निर्माण होईल असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

अजून सव्वा वर्ष निवडणुकीला असताना ४८ जागा शिंदे गटाला आहेत ते निवडणूकीच्या जवळ आल्यावर शिवसेनेच्या किंवा शिंदे गटाच्यावतीने जो काही त्यांचा पक्ष असेल त्याना ५-६ जागा मिळतील बाकीच्या सगळ्या भाजपच्या नावावर लढवल्या पाहिजे असे ऐनवेळी शिंदेंना सांगितले जाईल असेही जयंत पाटील माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना म्हणाले.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com