नागपूर :- पीओपी मूर्ती विरोधात नागपूर महानगरपालिकेने कठोर पवित्रा घेतला असून शहरात धडक कारवाईला गती दिली आहे. बुधवारी (ता.१३) विविध भागात करण्यात आलेल्या कारवाईमध्ये २१८ पीओपी मूर्ती जप्त करण्यात आल्या व या कारवाईमध्ये १ लाख ४० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार पोलिस आयुक्त श्वेता खेडीकर यांच्या सहकार्याने ही कारवाई करण्यात आली.प्रतिबंधित पीओपी मूर्तीच्या विक्रीवर आळा बसावा यादृष्टीने नागपूर महानगरपालिकेने मूर्ती विक्री स्थळांची तपासणी मोहिम सुरू केली आहे. मनपाचे घनकचरा व्यवस्थापन विभाग उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले यांच्या मार्गदर्शनात उपद्रव शोध पथकाचे जवान, पारंपरिक मूर्तिकार संघाचे प्रतिनिधी व पोलिस विभाग यांच्याद्वारे संयुक्तरित्या मूर्ती तपासणी मोहिम राबविण्यात येत आहे. पारंपरिक मूर्तिकार संघाच्या प्रतिनिधींकडून मूर्तीची तपासणी करून ती मातीची अथवा पीओपीची असल्याची शहानिशा केली जाते. पीओपी मूर्ती आढळताच तात्काळ मूर्ती जप्त करून संबंधितांवर १०००० रुपये दंडाची कारवाई केली जाते.
याअंतर्गत बुधवारी (ता.१३) सीताबर्डी, छोटा ताजबाग, मानेवाडा, सक्करदरा, आणि इतर भागातील मूर्तींची तपासणी करण्यात आली. यामध्ये १४ ठिकाणी पीओपी मूर्तींची विक्री होत असल्याचे दिसून आले. या सर्व विक्रेत्यांवर कारवाई करीत एकूण २१८ मूर्ती जप्त करण्यात आल्या व प्रत्येकी १०००० रुपये याप्रमाणे एकूण १४०००० रुपये दंड वसूल करण्यात आला.
स्वच्छता विभागाचे विभागीय अधिकारी रोहिदास राठोड, लोकेश बासनवार, विठोबा रामटेके, दिनेश कलोडे, उपद्रव शोध पथक सिव्हीलचे संजय खंडारे, यांच्या चमूने ही धडक कारवाई केली. यावेळी पारंपारिक मुर्तिकार सुरेश पाठक व चंदन प्रजापती प्रामुख्याने उपस्थित होते.
यांच्यावर झाली कारवाई
मे शिवम आर्ट, नेताजी मार्केट, सीताबर्डी (११मूर्ती), गणेश मूर्ती भांडार, नेताजी मार्केट, सीताबर्डी, (१२ मूर्ती), गौर मूर्ती भांडार, नेताजी मार्केट, सीताबर्डी, (११ मूर्ती), अस्तविनायक मूर्ती भांडार, ताजबाग, (१० मूर्ती), सुखकर्ता मूर्ती भांडार, मानेवाडा, बेस रोड, (१७ मूर्ती), श्री गणेश मूर्ती भांडार , मानेवाडा, बेसा रोड, (१४ मूर्ती), बेलेकर मूर्ती भांडार, मानेवाडा बेस रोड, (१७ मूर्ती), स्वामी मूर्ती भांडार, मानेवाडा, (३५ मूर्ती), नवरंग मूर्ती भांडार, सक्करदरा चौक, (०५ मूर्ती), साहू मूर्ती भांडार, सक्करदरा चौक, (०३ मूर्ती), विनावे मूर्ती भांडार, सक्करदरा चौक, (१६ मूर्ती), पंकज मूर्ती भांडार , ताजबाग रोड (३० मूर्ती), महालक्ष्मी आर्ट, सक्करदरा चौक(16 मुर्ती).